नवरात्र निमित्त आभार व्यक्त करण्यासाठी.
गेल्या २५-३० वर्षात पाहण्यात आलेल्या अशा ९ स्त्रीयांना नोंद करून त्यांच्यातील स्त्री तत्वाचे कौतुक आणि आभार मानु. काही ना काही कारणान मी काही ना काही या प्रत्येकी कडून शिकत आलेय. नकळत नोंद होत जाते. काही छान पाहिल की ते जस जमेल तस आपण जीवनात ऊतरवतो सुद्धा ते पण नकळत बरका! सगळ्यांच असच असत, माझ फार काही वेगळ नाही.
मागच्या वर्षी पण असा एक उपक्रम मी माझ्यापुरता मर्यादित न ठेवता ईतर मैत्रिणींना पण सहभागी करत केला होता. यंदा मी माझ्या आयुष्यात आलेल्या २५-३० वर्षातल्या ९ जणींना आठवुन त्यांच्यातल्या स्त्री तत्वाचे आभार मानायच ठरवलं, म्हणून हा प्रपंच.
खर तर हे अवघड आहे कारण अशा अनेक कर्तृत्ववान 'स्त्री' शक्तीचा मला अनुभव आलेला आहे. तरी एक प्रयत्न करतेय त्यातल्या ९ समोर मांडण्याचा.
ॐ जगदंबा माता की जय ॐ
१) पंपावरची ताई : २२ सप्टेंबर २०२५
आज जवळजवळ २०-२२ वर्ष ऑफिसला जाताना पेट्रोल भरतानाची आमची ओळख. ओळख म्हणजे ती काय तर त्या हसणार मी मी हसणार, काय म्हणता? ईतकीच. ईतकी वर्ष सलग मी त्यांना मन लावून पंपावर काम करतात बघत आलेय. मला नेहमी वाटायच की एवढाले तास सतत ऊभ राहून धुळीत काम करण तस कष्टाचच. रोजच्या जीवनात हे काम करताना किती जुळवून जगाव लागत असेल ना यांना. पण या सगळ्यात असुनही सदा आनंदीच बघत आलेय मी यांना. संयमान सहकार्यान समोरच्याशी हसुन या काम करताना दिसतात.
आज खुप दिवसांनी आलात ?
पंप बदलला की काय?
अरे व्वा! नवीन गाडी मस्त.
अरेच्चा! आज ऊशिरा कशा काय तुम्ही?
असे आमचे संवाद आणि ईतकाच संवाद.
माणसान फक्तं हसुन दखल घेतली तरी ती दूर दूर संबंध नसला तरी आपली वाटतात. अशा या पंपावरच्या ताईंना मी परवा मी फोटो मागितला आणि पळतच निघत म्हटल नुसत की काहीतरी लिहायचय मला झाल की दाखवते. गोड हसत बरं बरं म्हणत विश्वासान तो त्यांनी काढु दिला. मी त्यांची आभारी आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला मी त्यांच्यातील स्त्री तत्वाचं कौतुक करते आणि आभार मानते.
२) रेखा काकु सातपुते. २३ सप्टेंबर २०२५
मटार करंजी म्हटल की रेखा काकुच बाकी सगळे गौण, हा माझाच नाही तर आमच्या घरच्यांचा, आप्तेष्टांचा मित्र मंडळींचा विचार. खर सांगायच तर रेखा काकुना मी लग्नाच्या आधीपासून ओळखते. गोऱ्यापान, मोठ्ठ कुंकु नीटनेटकी मस्त साडी. त्यांना सतत स्वयंपाकघरात ऊत्तम पदार्थ करताना पाहून वाटायच एवढ काम करून चेहऱ्यावर दमल्याचा मागमूसही नसतो. त्या वयात याचं आश्चर्य ही वाटायचं.
रेखा काकुंनी कष्टानी लावलेलं सकाळच नाश्ता सेंटर, जे आम्ही सकाळी बरेचदा जाऊन चट्टा मट्टा करतो ते आज वटवृक्ष झालय. यंदाच २५ व वर्ष. अन्नपूर्णा रेखाकाकुनी कष्टानं हे तर ऊभ केलच पण माणसं पण खुप छान जोडली. या सेंटरच्या कामात लेकाचा पण काही वर्षांपासून सहभाग असतो. त्यांच मुलं सुना नातवंडांनी भरल घर बघुन आणखी छान वाटतं.
माणस जोडणं ही कला या पिढीलाच जास्त छान जमते जी आपण आत्मसात केली पाहिजे अस मला नेहमी वाटतं. काकूंचा मटार करंजी वर्क शॉप जो घरात चालतो तो मी पाहिलाय, एकदम पद्धतशीर आणि स्वच्छतेच काटेकोर पालन करत. काकु घरचं मुलांच पाहात हे सगळ करत ईथवर आल्याच मी जेव्हा पाहते तेव्हा कौतुक तर वाटतच पण आदरही वाटतो. त्या पिढीतील अशा सगळ्याच बायकांना मानलच पाहिजे. या नवरात्रात दुसऱ्या माळेला मी रेखा काकु मधल्या स्त्री तत्वांचे कौतुक करते आणि आभार मानते.
३) वैशाली महाजन. २४ सप्टेंबर २०२५
आजुबाजुच्या सुंदरींना आणखी सुंदर ठेवणारी ही पार्लर चालवणारी वैशाली. राहणीमान एकदम टापटीप आणि माझ्यासारखी फोटो वेडी.
वैशाली ला मी २२-२३ वर्ष ओळखतेय. माझं सुंदर तजेल दिसणार व्यक्तीमत्व निखरण यात हीचा मोलाचा हात. आम्ही समवयस्क आणि समसुखी सुद्धा! मला कायम तीच कौतुक वाटतं कारण लहानशा गावातुन शिकुन लग्न होऊन ही पुण्यात आली. गावातुन सौंदर्य प्रसाधन वापरून निखरून टाकण्याची कला घेऊन आलेली अशी ही. पुण्यात येऊन एकत्र कुटुंब सावरत स्वःताला या कलेत सिद्ध करत आज ती आमच्या आजूबाजूला फेमस झालीय. प्रत्येक ग्राहकाला योग्य सल्ला व वागणुक देणं, आलेल्या सगळ्याच स्त्रीयांना सुंदर करून सोडण आणि ते पण स्मितहास्यानी. वैशालीनी छान दिसतेय म्हटल की सगळ्या हूश्श करतात.
तुझे कामाचे पैसे वेगळे साठव हे सांगत खुप वर्षांपुर्वी मी तीला कॅश बाॅक्स दिलेला आज आठवला. मी हक्कानं दिलेला आणि तीनी प्रेमानं घेतलेला. खरतर तो घेणं तीला जड नव्हतं पण मला नको म्हटली नव्हती. ते मला आवडलं होतं. आधी एका कोपऱ्यात पार्लर होत, मग फेशिअल ची सोय झाली मग ईतरही सोई एकाच ठिकाणी केल्या हा तीचा बढतीचा चढताक्रम. कौतुकाचाच आहे कारण लहानशा गावातुन शिकुन पुण्या सारख्या शहरात बस्तान बसवणं सोप नाही. कितीही ढिगभर फाॅल पिकोला असु दे ही कायम हसतमुख बागडणारी आनंदी तसेच वेळेला खंबीर व्यक्ती म्हणून मी आज तिसऱ्या माळेला हीच्यातल्या स्त्री तत्वाच कौतुक करते आणि आभार मानते.
४) गौरी वाघमारे. २५ सप्टेंबर २०२५
जेव्हा आपल्याला एखाद्याच काम आवडत, ते करण्याची पद्धत आवडते तेव्हा आपल्याला छान वाटतं. यात काम कोणत याचा विचार नाही ते कस करताना दिसतय हे महत्त्वाचं अस माझ म्हणण आहे. आज चौथ्या माळेला मी माझ्या पाहण्यात आलेल्या अशा स्त्री तत्वाचं कौतुक करणार आहे आणि तीच्यातल्या स्त्री तत्वाचे आभार मानणार आहे ती आमची गौरी.
मी माझ्या घरचे आमचं घर छान ठेवतोच पण गौरीच्या मदतीशिवाय ते शक्य नाही. तीचा हात फिरला की घर चकाचक. गौरीला पण मी साधारण १५ वर्ष ओळखते, ती कामाला आहे याला पण बरीच वर्ष झाली. घरात पुजा असो वा काही कार्य आधी गौरी आहे ना हाच विचार येतो. ती आहे म्हणजे काम हलक होतं. एकदम मितभाषी, विश्वासू आणि काहीही विचारलं सांगितल की हलकस गोड हसणारी, मेहनती, ऊत्साही आणि वेळप्रसंगी मात्र खमकी व्यक्ती.
स्वकष्टाने ऊभ राहून मुलांना ऊज्वल भविष्य देणारी, माहेरच्यांवर जीव ओवाळून टाकणारी, त्यांच्या पाठबळासाठी परमेश्वराचे आभार मानणारी, लहानवयात स्वतः ला सिद्ध करणारी कौतुक करण्याजोगीच आहे. आजचा दिवस तीचा.
५) मंजु कोचर. २६ सप्टेंबर २०२५
"सुनो sss" असा आवाज आला रे आला की आम्ही बिल्डींगमधल्या सुंदर सद्गुणी मुली कान देऊन ऐकतो. हा करडा खणखणीत आवाज आमच्या मंजुचा. पेशानं ही शिक्षिका पण आमच्यात वावरते मात्र जवळघ्या घट्ट मैत्रीणीसारखीच. जगमित्र हे बिरूद तीला चपखल लागू होतं. ईतकं जोमदार ऊत्साही कोणी कस असू शकतं? हे मंजु कडे बघून मला कायमच वाटतं. १५-२० वर्ष एकाच बिल्डिंगमधे राहुन सहवासान एखादी जस वागेल तश्शीच ही तीन वर्षाच्या सहवासात आम्हाला लाभली आहे. ती फिटनेसवर पण बारकाईने लक्ष देते, टापटीप राहणं व वक्तशीरपणा हे तीचे गुण, ती कोणत्याही अडचणीत केव्हाही मदतीला हजर असते.
माझ्यापेक्षा मोठी असली तरी मी काय सगळ्याच तीला एकेरीच हाक मारतो. ती आपली वाटते. नोकरीमुळे माझा तीचा सहवास ईतरांपेक्षा किंचित कमी आहे पण तरी ही तुफानमेल मला बरच काही शिकवून जाते.
यंदाच्या नवरात्रातील पाचव्या माळेला मी मंजुमधल्या स्त्री तत्वाचं कौतुक करते आणि आभार मानते. आम्हा सगळ्यांना मंजुसारखं एनर्जेटिक राहण्याच कर्म करण्याची बुद्धी दे ग जगदंबे!
६) काकुबाई. २७ सप्टेंबर २०२५
काकुबाई हे पासष्ठच्या आसपासच्या वयाची नऊवारी लुगडं नेसणारी एक स्त्री. सौभाग्य खुप आधी गमावलेलं... माझ्या लहानपणातलं महत्वाचं मायाळु अन्नपूर्णा असं प्रेमळ व्यक्तिमत्त्व!
कायम डोक्यावर पदर, सतत स्वयंपाघरात कामात, कधी दुर्मुखलेल्या नसणार, आख्या वाड्यातल कोणाचही कोणी आलं आणि आपण घरी नसलो तर या अदबीन आदरसत्कार करणार, चुलीवर काम करायचा हातखंड, गौरी गणपतीत भिंत सारवणं तीला गेरू लावणं निगुतीन करणार, वाड्यातली सगळी लेकरं काकुबाईंनी भरलेल्याच माठातच पाणी पिणार तेच फक्त कस गार असतं? हे कोडच होतं आम्हाला.
१० बाय १२ च्या खोलीत अतिशय सुखानं कुटुंब नांदू शकतं हे यांच्याकडे बघुनच समजेल असं. कधीही पितळीच्या त्यांच्या सगळ्या भांड्यांची चकाकी कमी दिसणार नाही. सगळ कसं लख्खं असणार. खुप खुप प्रेमळ होत्या त्या. तश्या काकुबाई परत आयुष्यात आल्याच नाही. त्या गेल्या तेव्हा मी पुण्यात नव्हते, मला ते फार उशिरा समजलं. आपल बागडतं लहानपण बघणार एक व्यक्तीमत्व हरपल्याच दु:ख होत ते... बालपणीच्या चौकटीतल कोण कोण दिसेनास होतं ना तेव्हा काहुर माजतं मनात....
कोणीही आलं, कोणाच कोण जरी असलं पण दारात असेल मग ते स्वतः च्या घरच्या असो वा वाड्याच्या यथायोग्य आदरसत्कार करणं ते करून होणारा आनंद अनुभवणं मी त्यांच्याकडे बघुन शिकले. आजच्या सहाव्या माळेला मी काकुबाईंच्यात्या स्त्री तत्वाचं कौतुक करून आभार मानुन करू इच्छिते.
७) पोस्टमन ऊर्फ पोस्टवुमन ताई. २८ सप्टेंबर २०२५
सलग चार वर्षे मी या नवतरूण पोस्ट वुमनला भर दुपारी ३-३.३० वाजता ऑफिसमधे टपाल आणुन देताना बघतेय. आधीचे जे काका होते ते निवृत्त झाले नंतर मी आली. तरी त्यांच्या ईतकच लक्ष देऊन ही पोस्टेज पोचवते. आवरून असते एकदम टवटवीत पावडर कुंकू टोपी पाणी बाटली आणि जड खाकी पिशवी. मी आवर्जून पाणी विचारतेच. तो एकच काय तो धागा. आधी बर वाटायच दोघी होता आता त्या दुसऱ्या ताई दिसत नाहीत. अस लक्ष असतं. आपुलकी असते. जी आधीच्या काळातल्या पोस्ट मनकडे असायचीच अगदी तीच.
वय काय फार नसेल २५-२६ पण या वयाच्या ईतर मुलींपेक्षा वेगळी वाटते. कौतुक वाटत कारण सांगायला नकोच! मी फोटो काढला नाही प्रतिकात्मक लावतेय कारण तीला कामात काही अडचणी नकोत.
आज सातव्या माळेला या पिढीतल्या नवयुवती पोस्ट वुमन मधल्या स्त्री तत्वाच मी कौतुक करते आणि आभार मानते.
८) मंजुषा थत्ते. २९ सप्टेंबर २०२५
मंजुषा माझ्या शाळेतली पण मला ही ओळख खुप नंतर समजली. आपण आयुष्यात एखादी गोष्ट जेव्हा ध्यासान करतो ना तेव्हा विश्वपण आपल्याला मदत करत हे मी अनुभवलं. श्रीकृष्ण कृपेने अधिक महिन्यात ३० रांगोळ्या काढल्या त्या पाहून शाळेत्याच एकीन मंजुषा कृष्ण वृंदावन बद्दल रोज लिहते ते शोध वाच. तुझ्या आवडीच आहे. हा ईश्वरी संकेतच होता जणू.
वृंदावन च्या लालजींना समजुन घण्यासाठी मला मार्ग सापडला. ती ही मंजुषा अवखळपणे खळखळत्या झर्यासारख लिहुन लालजींच्या लीला आम्हा सामान्यांपर्यंत पोचवते. ती गेलीय का तिकडे? ती कशी लिहते? जे लिहते ते खरय का? असले प्रश्न मला कधीच पडले नाहीत.
ती आमच्यासारख्या कृष्ण भक्ती करतो अस थोडस वाटणार्यांना त्याच भक्तीमार्गावर सतत ठेवण्याच काम करते हे मात्र खरय २००%. कधी वृंदावन चे लालजी दर्शन लाभ देतील ठाऊक नाही पण आजच्या आठव्या माळेला मी लालजींची अस्मादिक म्हणून ऊल्लेख करणार्या मंजुषाचे कौतुक करते आणि आभार मानते.
जय श्रीकृष्ण!
९) नर्स : ३० सप्टेंबर २०२५
गोष्ट आहे २२ वर्ष पुर्वीची. पहाटे साडेपाचला त्या फडके हाॅस्पिटलमधे दिसल्या, मला पाहताच हसल्या. तिथच मला मनान हलक वाटल होतं. मी आई होताना डॉ. पै रायतूरकर यांच्या सहकर्मचारी / नर्स होत्या. जवळजवळ दोनतासात त्या मला परमेश्वराची छबीच वाटलेल्या. थोड्या जाड, कडक साडी नाईट शिफ्ट संपत आलेली वाटणार नाही ईतकी व्यवस्थित, प्रेमळ, हसतमुख त्यांनी मला ताब्यात घेतलं. माझी वेळ काही येईना नाॅर्मल साठी जेवढ मी कष्ट करत होते त्या पूर्ण पणे त्यात सहकार्य करत होत्या. त्या खोलीत नंतर ती आणि मीच आधी बाहेर आई तरी होती.
बोलत होतो मधेमधे आम्ही. सातला ड्युटी संपते माझी मी नसेन काळजी करू नको होईल नीट. मी डबडबल्या डोळ्यानी नका ना जाऊ तुम्ही च थांबा म्हटलेलं त्यांना. अग सगळ्या सारखच बघतात मला जायला हव माझी लेक पुरणपोळी करणार म्हणुन वाट बघेल. मी काही बोलले नव्हते लेकरासाठी जायच म्हटल त्यांनी त्यात मी तोच जीव तुटणारा अनुभव घेतच होते.
मी खुप कन्ट्रोल केलेला क्षण आजही काटा आणतो. दोन तासातल्या सगळ्या घडामोडींची ती साक्षिदार होती. तेव्हा ती नर्स मला आपली जवळची वाटु लागली होती. ती मला समजुन घेत होती आता कोण असेल देव जाणे मलाच माझ दीव्य पार पाडायचय मी मनाला ठणकवलेल आजही लख्ख आठवतय.
सात सत्तचाळिसला त्यांनीच मला माझा प्रणव दाखवला. तो क्षण आयुष्यात कधी विसरायची नाही मी. नंतर त्याला आंघोळीला नेल तेव्हा माझ्या जवळ आलेल्या आणि म्हटलेल्या ताई छान नाॅर्मल झालीस मी होते इथच. माझा पण पाय निघवेना म्हटल लेकरू पाहाव अन मगच जावं. आज माझ्या पण लेकीचा वाढदिवस असतो बरका! आज सात पूर्ण झाली.
अवाक् होते मी क्षणभर... आज नवरात्रीच्या या नवव्या माळेला मी त्या नर्सच कौतुक करते आणि अनंत आभार मानते.
१०) जया शिवहरे १ ऑक्टोबर २०२५
यंदा नवरात्रीत एक दिवस जास्त आला. योग असेल ते होतच. आजच्या दहाव्या दिवशी मी अश्या स्त्री तत्वाचे कौतुक आणि आभार व्यक्त करणार आहे जी मला फार आवडते. तीचा धीरान घेणे तसेच कोणत्याही परिस्थितीत सहनशीलतेनं सामना करणे हा बहुमूल्य गुण आहे.
माझ्या लग्नानंतरची भेटलेली ही आणि आजची ही यात तीच्या आयुष्यातील प्रगतीचा क्रम चढताच आहे, पण ती अजुनही जमिनीवर आहे. तीच्या आयुष्यातला सगळा प्रवास एका खमक्या स्त्री तत्वाशिवाय शक्यच नाही. वार्षिक एक भेट ईतकाच सहवास आमचा, पण माझ बोलण 'त' वरून ताकभात ओळखणारी, सतत आदरातिथ्य करायला सज्ज अशी सुंदर जया (भाभी) खुप वेगळी आहे.
या प्रेमळ स्त्री तत्वाचे आभार आणि कौतुक आजच्या दहाव्या दिवशी करते.
आणि यंदाच्या नवरात्रातल्या तीनच सुचवलेल्या आणि पुरा करून घेतलेल्या संकल्पाची सांगता करते. हे जगदंबे असेच काही ना काही सतत करत राहुन सेवेत राहण्याच कर्म करण्याची बुद्धी दे. जय जगदंबे
जय श्रीकृष्ण
सौ. गौरी पाठक
९९७०१६८०१४